
दोन महिलांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचा अहवाल रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त झाला.
नांदेड : नांदेड जिल्ह्यत करोनाचा प्रभाव कमी होत असतानाच डेल्टा प्लसचा शिरकाव नांदेडमध्ये झाला असून दोन महिला रुग्णांना डेल्टा प्लस झाल्याचा अहवाल बुधवार, दि.११ रोजी प्राप्त झाला. हा अहवाल प्राप्त झाल्यामुळे नांदेडवासीयांमध्ये एकच खळबळ उडाली असून नांदेडकरांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
नांदेड शहरासह जिल्ह्यत मागील महिन्यापासून करोनाचा प्रभाव कमी झाला असून रुग्णसंख्या व मृत्युसंख्येला ब्रेक लागला आहे, असे असतानाच करोनाबाधित असलेल्या दोन महिलांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचा अहवाल रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त झाला. यामध्ये नवीन नांदेड हडको परिसरातील एका १९ वर्षीय महिलेसह लोहा येथील ३८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. काही रुग्णांचे स्राव नमुने विषाणुच्या जनुकीय क्रमनिर्धारणासाठी नित्याने प्रयोगशालेय सर्वेक्षणासाठी राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्था, राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्था, इन्स्टिटय़ूट ऑफ जिनेमिक अँड इंटिग्रेटेड बॉयोलाजी या संस्थांना पाठविण्यात येतात. दि.२४ जून रोजी हडको येथील एक १९ वर्षीय महिला तसेच दि.२ जुलै रोजी लोहा येथील एक ३८ वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आली. सदरील प्रयोगशालीय सर्वेक्षणात या दोन महिलांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून याबाबतचा अहवाल राज्यस्तरावरून नुकताच प्राप्त झाला.
डेल्टा प्लसचा अहवाल आलेल्या दोन्ही रुग्णांची प्रकृती सद्यस्थितीत उत्तम असून हे दोन्ही रुग्ण करोना संसर्गातून बरे झाले आहेत. त्यांच्या संपर्कातील इतरांची प्रकृती चांगली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता चारसूत्रीचा अवलंब करीत आपली व परिवाराची काळजी घ्यावी.— डॉ.नीळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक