मुंबई, दि.11: म्हाडाच्या कोकण मंडळ लॉटरीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या विजेत्या सदनिकाधारकांकडून डेव्हलमेंट चार्जेस आकारणा-या ठाणे येथील सिद्धी रियल इस्टेट डेव्हलपर्स या बिल्डरला म्हाडाने वठणीवर आणले आहे. ढोकाळी (ठाणे) येथील विकासकाने 132 सदनिकांधारकांना मागणी केलेले साडेतीन लाखाहून अधिक डेव्हलमेंट चार्जेस आकारण्यास सक्त मनाई करतानाच सदनिका किंमतीव्यतिरिक्त केवळ शासकीय शुल्क आकारण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. या आदेशाची प्रत महारेरा अध्यक्षांकडेही माहितीस्तव देण्यात आली आहे. या निर्णयामुळे म्हाडातील यशस्वी लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून परवडणा-या किंमतीत घर घेण्याचे त्यांचे स्वप्न साकार होणार आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळ लॉटरीची सोडत गेल्या फ़ेब्रुवारी 2024 मध्ये झाली. त्यात स्किम कोड-380, हायलॅंड स्प्रिंग, ढोकाळी (ठाणे) येथील सदनिकेचा समावेश होता. सिद्धी रियल इस्टेट डेव्हलपर्स या विकासकाने 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतंर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी म्हाडाला 132 सदनिका उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्यातील विजेत्यांनी 1 टक्के प्रशासकीय शुल्क म्हाडाकडे भरल्यानंतर उर्वरीत रक्कम तसेच इतर शासकीय शुल्क विकासकाकडे परस्पर भरण्याचे यशस्वी लाभार्थ्याना कळविण्यात आले होते.
परंतु, सदनिका किंमतीशिवाय विकासकाकडून नियमबाह्य आणि अवाजवी शुल्क आकारण्यात येत असल्याची तक्रार लाभार्थ्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली होती. म्हाडाने 18 लाखात दिलेल्या सदनिकेसाठी विकासकाकडून विजेत्यांना अतिरिक्त 9 लाख रुपयांचे मागणीपत्र देण्यात आले होते. त्यामुळे शासकीय व्यतिरिक्त इतर कुठलेही शुल्क आकारु नये तसेच रेरा नियमानुसार विजेत्यांना सुधारित मागणीपत्र पाठवून ताबा देण्याची कार्यवाही करण्याबाबत म्हाडा कोकण मंडळाच्या वतीने विकासकास दि. 8 जुलै 2024 रोजी कळविण्यात आले होते.
श्री. संजीव जयस्वाल, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा
या पत्राचे अनुपालन करण्यास विकासकाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची तसेच सदनिका व्यवहारात अडचणी निर्माण केल्या जात असल्याची तक्रार गोविंद करवा व अरविंद अदाते यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्याकडे गेल्या 22 जुलै 2024 रोजी लोकशाही दिनी लेखी निवेदनाद्वारे केली. त्यावर विकासक, विजेते व म्हाडा अधिका-यांची या प्रकरणात संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले होते.
तक्रार बेदखल करणे भोवले
उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली दि.31 जुलै व 10 सप्टेंबर 2024 रोजी विकासकाचे भागीदार, पात्र विजेते व म्हाडा अधिका-यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेप्रमाणे विकासक सिद्धी रियल इस्टेट डेव्हलपर्स यांचे भागीदार यांना विजेत्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. परंतु विकासकाच्या वतीने त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शासन धोरण व म्हाडा नियमानुसार उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी आदेश पारित केले.
शासन धोरणाप्रमाणे कारवाई
राज्यातील बांधकामासाठी एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीतील (युडीसीपीआर-2020) सर्वसमावेशक घरांच्या तरतुदीनुसार 20 टक्के सर्वसमावेशक योजना ही शासनाची महत्वाकांक्षी योजना असून अत्यल्प (ईडब्ल्यूएस) व अल्प (कमी उत्पन्न) गटातील सर्वसामान्य जनतेला परवडणा-या किंमतीत घराचा लाभ मिळावा, हा मुख्य उद्देश आहे. अशा घरांच्या बांधकाम खर्चावर 25 टक्के अतिरिक्त खर्च समाविष्ट करुन म्हाडाकडून सदनिकेची किंमत निर्धारित करुन लॉटरीची जाहिरात काढली जाते. तसेच प्रशासकीय शुल्क वगळता उर्वरीत रक्कम थेट विकासकाकडे जमा केली जाते. त्यामुळे विकासकाकडून अतिरिक्त शुल्क आकारणे चुकीचे आहे. उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या या निर्णयामुळे नियमबाह्य डेव्हलपमेंट चार्जेस आकारणा-या विकासकांना योग्य संदेश गेला आहे.
करारनामे करुन ताबा देण्याचे आदेश
पात्र लाभार्थ्यांना दिलेल्या कॉस्ट शीटमधील डेव्हलपमेंट चार्जेसपोटी आकारलेले आकारलेले 3 लाख 58 हजार 635 ही रक्कम मागणी आकारणी करणे पूर्णत: चुकीचे असून सदर रक्कम आकारण्यात येऊ नये. जाहिरातीतील नमूद विक्री किंमतीव्यतिरिक्त केवळ अनुज्ञेय शासकीय शुल्क आकारुन त्याप्रमाणे तपशीलनिहाय शुल्क (कॉस्ट शीट) लाभार्थ्यांना कळ्विण्यात यावे व सर्व सदनिकांचे करारानामे ताबडतोब करुन घेऊन त्याचा लाभार्थ्यांना लवकरात लवकर देण्याची उचित कार्यवाही करुन त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सिद्धी रियल इस्टेत डेव्हलपर्स, ठाणे यांना दिले आहेत.
विश्वास सार्थ ठरवला
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सुरु केलेल्या लोकशाही दिनाच्या उपक्रमामुळे आमच्या समस्याकडे लक्ष वेधण्यास मदत झाली. आर्थिक दुर्बल/कमी उत्पन्न गटातील विजेत्या 132 लाभार्थ्यांना म्हाडाने न्याय देऊन शासन संस्थेप्रती जनतेच्या मनात असलेल्या विश्वासात भर टाकली आहे. योग्य मार्गाने योग्य मागणी असेल तर सर्व घटकांना न्याय मिळतो, हे संवेदनशील मनाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दाखवून दिले आहे. या निर्णयामुळे पारदर्शकता, विश्वास आणि सामान्य जनतेचा आधार या ब्रिदवाक्याला म्हाडा सार्थ ठरली आहे. उपाध्यक्ष संजीव जयस्वाल व म्हाडाचे आम्हा विजेत्यांकडून आभार.
55 लक्ष निधीतील विकास कामांचे भूमिपूजन साहेबराव गायकवाड यांच्या पाठपुराव्याने ५५ लक्ष रुपयाच्या कामांना मंजुरी
साहेबराव गायकवाड यांच्या पाठपुराव्याने ५५ लक्ष रुपयाच्या कामांना मंजुरी नांदेड – भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड यांच्या प्रयत्नातून माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विकास निधीतून…
श्री युवा एकता दुर्गामाता नवरात्र मंडळ कैलासनगर नांदेड यांच्या तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी तब्बल 111 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
श्री युवा एकता दुर्गामाता नवरात्र मंडळ कैलासनगर नांदेड यांच्या तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी तब्बल 111 रक्तदात्यांनी रक्तदान केले. मा.नगरसेविका सौ.वैशाली मिलिंद देशमुख, भाजपा महानगर सरचिटणीस…