
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा घ्यायची की नाही यावर चर्चा सुरू होती, अखेर आज या विषयावर पडदा पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सीबीएसईच्या बारावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भिती देखील वर्तवली जात होती. त्यामुळे या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
या बैठकीला सीबीएसईचे अध्यक्ष उपस्थित होते. याशिवाय या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरही सहभागी होते.
या संबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, देशभरातील कोरोनामुळे झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारने बारावीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले आहे.