नांदेड, दि. 7 :- मागील काही आठवड्यापासून नांदेड जिल्ह्यात कोविड बाधितांची संख्या दररोज हजारापेक्षा अधिक निघत आहे. यात काही जणांची प्रकृती ही उशिरा तपासणी करत असल्यामूळे व दुखणे अंगावर काढत असल्यामूळे अति गंभीर होत आहे. साध्या कोविड बाधितांना गृहविलगीकरण अथवा जिल्हा प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेतले ते पुरेसे ठरतात. मात्र जे अति गंभीर कोविड बाधित आहेत अशा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये तात्काळ उपचाराची गरज भासते. काही रुग्णालयात कोविड केअर सेंटरमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांनी रुग्णालयात गर्दी केल्याने अति गंभीर रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयातील खाटा मिळणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. यावर मार्ग काढण्यासाठी नागरिकात जनजागृतीसह जिल्हाधिकारी कार्यालयात एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

जे रुग्ण अति गंभीर नाहीत, ज्यांनी लक्षणे दिसताच तात्काळ तपासणी करुन शासनाच्या सुचनेनुसार विलगीकरण अथवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेतले आहेत त्यांच्या तब्येती अधिक खालावल्या नाहीत. गृहविलगीकरण आणि कोविड केअर सेंटरच्या उपचारावरच ते बरे होऊन परतले आहेत. मात्र ज्यांनी दुखणे अंगावर काढल्यामूळे स्वत: प्रकृतीला धोक्यात आणले आहे अशा अति गंभीर कोविड बाधित रुग्णांवर तात्काळ उपचार होण्याच्या दृष्टीने शासकीय व खाजगी रुग्णालयातील उपलब्ध खाटांची  आवश्यक ती माहिती मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे 24 X 7 कोविड नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ देण्यात आले आहे. या कोविड कंट्रोल रुम येथे दुरध्वनीवरुन संपर्क साधावयाचा असल्यास त्यांनी 02462 (235077) या क्रमांकावर संपर्क साधावा.