
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग असल्याचा दावा केला जात आहे, यामुळे देशभरातील राजकारण देखील तापलेले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे.
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, ज्ञानवापीचा इतिहास आहे जो आपण बदलू शकत नाही. प्रत्येक मशिदीत शिवलिंग पाहणे योग्य नाही. हे का केले जात आहे?, असा सवाल करत ज्ञानवापी हा श्रद्धेचा विषय आहे, त्यामुळे ज्ञानवापीच्या वादावर परस्पर सामंजस्याने मार्ग काढण्याचे आवाहन भागवत यांनी केले. तसेच, आम्हाला अयोध्येतील राम मंदिरानंतर आता कोणतेही आंदोलन करायचे नाही, असेही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. ते नागपूर येथील आरएसएसच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
मोहन भागवत पुढे म्हणाले की, रोज एक एक मुद्दा काढणे योग्य नाही. ज्ञानवापीबद्दल श्रद्धा आहे, परंपरा आहे. पण प्रत्येक मशिदीत शिवलिंग का पहावे? तीही एक पूजाच आहे. आमचा इथल्या कोणत्याही पूजेला विरोध नाही. प्रत्येकामध्ये पवित्रतेची भावना असते. ज्ञानवापीसंदर्भात न्यायालयाचा जो निर्णय येईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे, असेही ते म्हणाले.