– मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

मुंबई, दि. 11 : नांदेड जिल्ह्यातील दिवशी (बु.) (भोकर) प्रकल्पास 37 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. हा सिंचन तलाव मराडवाड्यातील 251 ते 600 हेक्टर सिंचन क्षमता असणारा मृद व जलसंधारण विभागाचा पहिलाच प्रकल्प असून या सिंचन तलावाचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.

श्री. गडाख म्हणाले, दिवशी (बु.) सिंचन तलावाची प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेसह निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यादेश देण्यात आले आहेत. या तलावाचे काम तात्काळ सुरु करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

जलसंधारण विभागांतर्गत प्रथमच अशा प्रकारच्या प्रकल्पांना मंजुरी देण्याकरीता श्री. गडाख यांनी धाडसाचे निर्णय घेतले आहेत. हा प्रकल्प दिवशी परीसरासाठी अतिशय महत्वाचा आहे. या तलावामुळे दिवशी, किनी व पाकी या गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. या सिंचन तलावासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अशोक चव्हाण यांचा पाठपुरावा होता.

जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यातील सिंचनाच्या अनेक कामांना मंजुरी देण्यात आली आहे. दिवशी सिंचन तलावासारखे अधिक सिंचन क्षमतेचे तलावास मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात येत असून जलसंधारण विभाग नवीन आकार घेत असल्याने राज्याची सिंचन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.