या मागणीला घेऊन एसएफआय व डीवायएफआयचे जि.प. नांदेड समोर आक्रमक आंदोलन!

नांदेड:           राज्यात मागील काही दिवसांपासून शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कमी पटसंख्या हे कारण पुढे करुन ग्रामीण व दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा ह्या बंद केल्या जात आहेत. नांदेड जिल्ह्यात विविध तालुक्यांतील 336 त्यापैकी सर्वात जास्त (किनवट 71 तर मुखेडमधील 43 शाळा तसेच माहूर 23, अर्धापूर 06, भोकर 15, बिलोली 06, देगलूर 18, धर्माबाद 05, हदगाव 25, हिमायतनगर 18, कंधार 34, लोहा 34, नायगाव 13, उमरी 07, नांदेड 13, मुदखेड 05) जिल्हा परिषदेच्या शाळा कायमस्वरुपी बंद करण्याचे आणि त्या शाळा समायोजन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने प्रस्तावित केला आहे. हा निर्णय अत्यंत चुकीचा असून याचा आम्ही तीव्र विरोध करतो. शाळेच्या सोईसुविधांमध्ये वाढ करुन, दर्जेदार शाळा बनविण्याचे सोडून कायमच्याच शाळा बंद करणे हे अत्यंत घातक निर्णय असून ग्रामीण, कष्टकरी, शेतकरी मजुरांच्या विद्यार्थ्यांचे जीवन उद्वस्त करण्याचे षड्यंत्र आहे. या निर्णयामुळे आधीच शिक्षणापासून लांब असलेल्या आदिवासी, दलित, बंजारा व बहुजन समाजातील विद्यार्थी कायमच शिक्षण क्षेत्रातून बाहेर फेकल्या जातील. शाळा बंद करण्याचे अत्यंत वाईट परिणाम विद्यार्थी वर्गावर होईल.

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरीत रद्द करावा. व त्या शाळा अधिक सक्षम करण्यासाठी त्वरीत पावले उचला. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमधील मुलभूत सुविधा उपलब्ध करा. शाळांचा गुणात्मक दर्जा सुधारा. अनेक शाळांच्या शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागा त्वरीत भरा आदी मागण्यांना घेऊन डीवायएफआय व एसएफआयच्या वतीने आक्रमक आंदोलन झाले. तसेच जिल्हा परिषदेचे श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी या आंदोलनात किसान सभेचे कॉ.अर्जुन आडे, शेतमजूर युनियनचे कॉ.विनोद गोविंदवार,मंजुश्री कबाडे, अंकुश अंबुलगेकर, सीआयटीयू कामगार संघटनेचे कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ.उज्ज्वला पडलवार,कॉ जनार्दन काळे डीवायएफआयचे कॉ.बालाजी कलेटवाड,कॉ.स्टँलिन आडे, एसएफआयचे कॉ.मीना आरसे,कॉ.विशाल भद्रे,कॉ.स्वप्निल बुक्तरे,कॉ.प्रविण चुकेवाड,कॉ.अक्षय गायकवाड आदी उपस्थित होते.