
नांदेड दि. 13: (साहेबराव गायकवाड)
कोचिंग क्लासेसमध्ये तुंबलेले विद्यार्थी आणि स्वतःची तुंबडी भरून घेणारे क्लासेसचालक यावरून सध्या सोशल मीडियावर टीकेचे रान उठत आहे. वर्तमानपत्राच्या जाहिरातीत एकसारखेच विद्यार्थी वेगवेगळ्या क्लासेसचे गुणवंत कसे, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील पत्रकारिता विषयाच्या एका प्राध्यापकाने कोचिंग क्लासेस चालकांवर टीका केली असताना एका नामांकित दैनिकाच्या पत्रकाराने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पत्रकारिता विषयाचे प्राध्यापक आणि नामांकित दैनिकाचा पत्रकार असा वाद रंगला आहे. या दोघांनीही त्यांची काय मते मांडली आहेत ते पाहुयात.
कोचिंग क्लासेसच्या जाहिराती: उघडा डोळे पहा नीट
नांदेड शहर हे वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी कोचिंग क्लासेसचे शैक्षणिक हब म्हणून उदयास येत आहे. जाहिरातीवर कोट्यवधींची वार्षिक उलाढाल करणारे अनेक क्लासेस शहरात आहेत. वर्तमानपत्रामध्ये एखाद्या उमेदवाराची गुणवत्ता त्याच्या क्लासेस वरून ठरवली जात आहे. आम्हीच अव्वल, सर्वोत्कृष्ट, रेकॉर्ड ब्रेक, पॅटर्न असे शाब्दिक खेळ करुन कोचिंग क्लासेस कोणत्याही स्तराला जातात ही नव्याने मेडिकल, इंजिनिअरिंग क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या डोळ्यात धुळफेकीचा खेळ होत आहे. विद्यार्थ्यांची पळवा-पळवी केली जाते ती उघड आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक क्लासेसच्या जाहिरातीमध्ये तेच ते विद्यार्थी झळकत आहेत. हे विद्यार्थी कॉलेजमध्ये जर गेलेच नसतील तर अशा विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाचे गुण कशाच्या आधारे दिले असतील बरे, कनिष्ठ महाविद्यालय ही केवळ नावाला आहेत का? हाच प्रश्न आज पडतोय…
नांदेडमध्ये जी नामांकित कनिष्ठ महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी जे शिक्षक कार्यरत आहेत त्यांची शैक्षणिक पात्रता ही उत्कृष्ट दर्जाची आहे आणि त्यात पात्रतेनुसार शासन सुद्धा त्यावर खर्च करते पगाराच्या माध्यमातून. महाविद्यालयातील शिक्षण विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी कुठे कमी पडतात की क्लासेस विद्यार्थी बाहेर करतात, त्यामुळे आम्हाला शिकवायची गरज नाही अशी तर प्रथा नाही ना? या गोष्टींबद्दल आपल्याला विचार करण्याची गरज आहे. पैसा असेल तर तुम्ही डॉक्टर व्हाल, पैसा असेल तर तुम्ही इंजिनिअर व्हाल, पैसा असेल तरच तुम्ही नामांकित कोचिंग क्लासेसला शिका… अशीच काही पद्धत नांदेडसह इतरही शहरांमध्ये फोफावत आहे. हा सगळा खेळ गुणवत्तेचा आहे की क्लासेसवाल्यांच्या पद्धतशीर जाहिरात तथा मेहनतीचा आहे…
प्रसार माध्यमांनी जाहिरात घेत असताना किंवा जनतेसाठी प्रकाशित करत असताना, जाहिरातीत जर काही असत्य बाबी आढळून येत असतील तर त्या डोळे बंद न करता जाहिरात करण्याची गरज आहे, असं मला वाटतं. मुद्रित माध्यमांचा प्रभाव अधिक निर्माण होतो कारण आपल्याकडे एखादी गोष्ट छापील असेल तर ती खरी आहे ही धारणा झालेली असते आणि ही माहिती आपण कोणाकडे केव्हाही देऊ शकतो त्यामुळे त्या वर्तमानपत्राच्या छापील जाहिराती व बातम्यांवर आपला विश्वास असतो. व्यावसायिक बनलेल्या आजच्या माध्यम गटावर मला टीका करायची नाही, परंतु पत्रकारिता, जाहिरात, जनसंपर्क अशा अनेक विषयातून आपण समाजामध्ये दिशादर्शक असं काम करत असतो. अशा वेळेस समाजापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये यासाठी सुद्धा माध्यमांनी प्रयत्न करावेत डोळे उघडे ठेवून नीट जाहिराती द्याव्यात एवढीच अपेक्षा…!
पालकांच्या जनहितार्थ
प्रा.लोनेकर प्रितम टी
माध्यम शास्त्र संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड.
निश्चितच चहुबाजूंनी विचार व्हावा…
कोचिंग क्लासेसच्या निकालावरून सध्या सोशल मीडियावर अनेकांनी कोचिंग इंडस्ट्रीला ट्रोल करणं सुरू केलं आहे, परंतु ज्यांचं पित्त खवळलं ते कोणत्या कारणांनी…हा विचार करण्याइतपत आजचा पालक सजग झाला आहे.
खरच आज जर कोचिंग इंडस्ट्री नांदेडमध्ये नसती तर किमान दोन हजार कुटुंबांना रोजगार कुठून मिळाला असता? आज या क्लासेसमध्ये किमान आपल्या भागातील #एक_हजारहुन अधिक जण नोकरी करतात. त्याचबरोबर परिसरात असलेल्या सर्व दुकान #सलूनपासून_ते_बुटाच्या_पॉलिशपर्यंत. त्यांना विचारा लॉकडाऊनमध्ये त्यांचे काय हाल झाले. आणि एरवी किती धंदा होता सलून असेल स्टेशनरी असेल कापड दुकान पोह्याची चहाची हॉटेल मेस होस्टेल हे सर्व काही या ठिकाणी या कोचिंग क्लासेसमुळे येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळेच चालू आहे. यातून नांदेडमध्ये किमान #5000 कुटुंब तरी जगत असतील. इतर इंडस्ट्री नांदेडमध्ये नाही. परंतु #शैक्षणिक_हब जर होत असेल तर त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा सकारात्मक असायला हवा. यात विरोधात कमेंट करणाऱ्या बरेच जणांचे #हितसंबंध जोपासले गेले नाहीत, कोणी काही तरी कारणाने नाराज असेल म्हणून ते सोशल मीडियावर टीका करत आहेत असं मला वाटतं. त्यांनी दूरदृष्टी ठेऊन विचार करावा. #सत्यता पडताळायचीच असेल तर त्या विद्यार्थी आणि पालकांना बोला? खरं तर त्यांनी ऑब्जेक्शन घ्यावं. परंतु इथे स्वयंघोषित समाजसेवकांचं पोटसुळ उठलंय.
क्लासेस काय नांदेड पासूनच सुरू झाले नाहीत, अगोदरच कॉर्पोरेट कोचिंग इंडस्ट्री कोट्यात उभी राहिली आहे, त्यात आपल्या मराठवाड्यातील लोकांनी अफलातून कामगिरी करून नावलौकिक मिळवलं तर आपल्याच पोटात दुखायला लागलं. का तर कुणाचं तरी ऍडमिशन फ्री करून दिली नाही अथवा एखाद्या कार्यक्रमाला वर्गणी दिली नाही म्हणून का? टीका करणाऱ्यांनी एकवेळ हे कोचिंग क्लासेस किती टॅक्स भरतात आणि आपल्या जिल्ह्यातील किती लोकांना रोजगार उपलब्ध झाला याचाही अभ्यास करावा. माझ्या महितीस्तव आपल्या नांदेडमधील एका क्लासेसमध्ये सेक्युरिटी गार्ड ते प्राध्यापकापर्यंत किमान ५०० लोक नोकरीवर आहेत. यातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
आपण #कोटा येथे जाऊन पहा तेथील लोकांची कोचिंग क्लासेस विषयी असलेली भावना. तेथील ऑटोवाला सुद्धा तुम्हाला सन्मानाची वागणूक देऊन समोरच्या व्यक्तीला म्हणजेच कोचिंग क्लासेस वाल्यांना देखील सन्मानाची वागणूक देतो. कारण त्यांना माहिती आहे आपलं पोट त्यावर अवलंबून आहे, जर त्या वाळवंटात कोचिंग क्लासेस नसते तर देशभरातून लोक तिथे गेले नसते आणि त्यांचा व्यवसायदेखील चालला नसता, ही जाणीव तेथील ऑटो चालवणाऱ्यापासून ते प्रत्येक व्यावसायिकाला आहे. हा फरक आहे आपल्यामध्ये आणि इतर राज्यांमध्ये… आणखीन भरपुर लिहिता येईल.. तूर्तास थांबतो.
श्रीनिवास_भोसले
पत्रकार, नांदेड.
गुणवंत विद्यार्थीही संशयाच्या पिंजर्यात ..!
नांदेडचे दर आणि इतर ठिकाणी हेच क्लासेसचालक आकारत असलेले दर यात मोठी तफावत आहे. तेव्हा या स्थानिकांनी आणखी निर्माण होणारा रोजगार बुडवला, असे म्हणावे का? वर्दळीच्या मार्गावर रस्त्याला जोडून शटर आणि तेथूनच थेट वाहतुकीच्या गराड्यात बाहेर पडणारी मुले असे चित्र नांदेडलाच आहे. हे खरेच शैक्षणिक हब असेल तर क्लासेस चालकांना खाजगी महाविद्यालय उघडून द्या…किमान सरकार आणि पालकांचा दुहेरी पैसा वाया जाणार नाही…उलाढाली होतच राहतील..पण सामान्य शेतकर्याला घाम गाळून, रक्ताचे पाणी करून आपल्या मुलांना गुणवंतांच्या स्पर्धेत उतरण्यासाठी फसव्या जाहिरातीवर विश्वास ठेवावा लागत आहे, त्याचे काय?
कोचिंग क्लासेस हा सर्वमान्य व्यवसाय असला तरी एकाच विद्यार्थ्यांची छायाचित्रे सर्वानी वापरून त्यांचे बाजारीकरण केल्याने दुर्दैवाने त्या गुणवंत विद्यार्थ्यांनाही संशयाच्या पिंजर्यात उभे केले जात आहे..
तीन विषयाची शिकवणी असताना सर्व आमच्यामुळे झाले, असे दाखविण्याचा प्रकार किळसवाणा आहे. वैद्यकिय क्षेत्रात जाहिराती आणि रुग्णांची ओळख पटविण्यासाठी जे निर्बंध आहेत, त्याच धर्तीवर अशा जाहिराती करण्यावर निर्बंध आले पाहिजेत..कारण अशा जाहिराती सुदृढ समाज निर्मिती रोखण्यासाठी कारणीभूत ठरतात…विद्यार्थी, क्लासेस आणि शैक्षणिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात…वृत्तपत्र म्हणून जाहिराती घेण्यास आपल्याला बंधने नाहीत…पण जाहिराती दिशाभूल करणार्या छापाव्या लागतात, तेव्हा स्वतःच विश्वासार्हतेची जबाबदारी आमची नाही, हे वारंवार छापण्याची वेळ आपल्यावर येत असते.
– गोविंद करवा, नांदेड