
परिक्षा संचालकाची विद्यापीठातून हाकालपट्टी करा
नांदेड / प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पेट २०२२ परीक्षा पार पडली सदरील परीक्षेमध्ये परीक्षा केंद्र प्रमुख व परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक यांच्या संगनमताने विद्यार्थ्यांना मोकळीक देऊन मास कॉपी करण्यात आलेली आहे. तसेच परीक्षा दालनात मोठ्या प्रमाणात खुल्या प्रकारे चर्चा करून विद्यार्थ्यांनी पेपर सोडवले असल्याने खऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे पेट परीक्षेची उच्चस्तरीय कमिटी मार्फत चौकशी करून दोषी व्यक्तीवर तात्काळ कारवाई करावी, या मागणीला घेऊन दि १४ ऑगस्ट पासून एसएफआय विद्यापीठ कमिटीच्या वतीने विद्यापीठ दालनात उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या गंभीर विषयी तक्रार करूनही जवळपास ३० दिवसांचा कालावधी होऊन गेला तरी देखील दोषी परीक्षा केंद्रप्रमुख व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक यांच्यावर अद्यापही कारवाई झाली नाही ही कारवाई कधी होणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.याबाबत संघटनेने परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालकांकडे या विषयावर चर्चा करण्यासाठी गेले असता विद्यार्थ्यांना आरे-तुरे ची व उद्धट भाषा वापरून बाहेर काढून टाकण्यात आले असल्याचे देखील निवदेनात म्हटले आहे.
सदरील प्रकारात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल करून दोषीना पाठीशी घालताना दिसून येत आहेत. त्यामुळे सर्व परीक्षा केंद्रातील परीक्षा दालनाचे सीसीटिव्ही फुटेज चेक करून करून अभ्यासू व योग्य पेपर सोडवलेल्या विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा,परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक यांची संचालक पदावरून हकालपट्टी करून सदरील परीक्षेची उच्चस्तरीय चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करावा. अशी मागणी कुलगुरू डाॅ.उद्धव भोसले यांच्याकडे एसएफआय विद्यापीठ कमिटीचे काॅ.विशाल भद्रे , काॅ.पवन जगडमवार , काॅ.विजय हाणवंते , काॅ.सुनिल तलवारे यांनी केली आहे.