नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (Union Public Service Commission, UPSC) २०२१ चा निकाल जाहीर झाला आहे. यंदा पहिल्या तीन टॉपर्स मुली आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२१ मध्ये श्रुती शर्माने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, द्वितीय अंकिता अग्रवाल आणि तृतीय क्रमांकांवर गामिनी सिंगला यांनी जागा पटकावली आहे. या परिक्षेत उत्तीर्ण झालेले आणि मुलाखतीसाठी उपस्थित राहिलेले उमेदवार त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर तपासू शकणार आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्राथमिक परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आली आणि परीक्षेचा निकाल 29 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला होता. मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत घेण्यात आली आणि निकाल 17 मार्च 2022 रोजी घोषित करण्यात आला. 5 एप्रिलपासून सुरू झालेल्या आणि 26 मे रोजी संपलेल्या परीक्षेची मुलाखत ही शेवटची फेरी होती. आता या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावेळी एकूण 685 उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.