पुणे – महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) पीएच.डी. (Ph.D.) करणाऱ्या विद्यार्थ्यांना  १ जानेवारी २०२२ पासून ३१ हजार रुपये फेलोशिप  देण्याची घोषणा ‘महाज्योती’चे अध्यक्ष आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण व इतर मागासवर्गीय मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी केली. एकूण ७५३ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या मागणीसाठी महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीतर्फे गेल्या ५३ दिवासांपासून मुंबईतील आझाद मैदानावर लढा सुरू होता. अखेर या लढ्याला यश आल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. ‘महाज्योती’तर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकी पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप देण्यात येते. मात्र दिल्या जाणाऱ्या फेलोशिपमध्ये वाढ करण्यात येऊन ती २१ हजार रुपयांवरून ३१ हजार करावी, या मागणीसाठी समितीतर्फे आंदोलन करण्यात येत होते. यावर ‘महाज्योती’ने मेपासून ३१ हजार रुपये प्रतिमहा फेलोशिप देण्याचा ठराव मंजूर केला होता. त्याप्रमाणे ही फेलोशिप देण्यात येणार होती. मात्र, विद्यार्थ्यांनी १ जानेवारी २०२२ पासून देण्याची मागणी केली होती आणि आंदोलन सुरूच ठेवले होते.गेल्या ५३ दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू ठेवले होते. आमच्या लढ्याला कोणत्याही राजकीय ओबीसी नेत्याचे पाठबळ नव्हते. मात्र, प्रामाणिकपणे लढा सुरू ठेवल्याने यश मिळाले. विद्यार्थ्यांनाही न्याय मिळू शकतो, हे या आंदोलनावरून दिसून येते. सरकारवर दबाव निर्माण करावा लागला. आमची मागणी मान्य केल्याने ‘महाज्योती’चे मनापासून आभार. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.- नितीन आंधळे, अध्यक्ष, महाज्योती विद्यार्थी संघर्ष समिती