
मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांची खासदारकी अडचणीत आली आहे. कारण, हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवलं आहे. इतकंच नाही तर नवनीत राणा यांना दोन लाखांचा दंडही ठोठावला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती.
अडसूळ यांच्या आरोपानुसार नवनीत राणा या मूळच्या पंजाबच्या आहेत, तिथे त्यांची लुभाणा ही जात आहे. त्या महाराष्ट्रात निवडणूक लढताना त्यांनी मोची या अनुसूचित जातीअंतर्गत निवडणूक अर्ज भरला. तर राणा यांचे पती रवी राणा हे रजपूत आहेत. अशा तीन जातींशी नवनीत राणा यांचा संबंध आहे, असा अडसूळ यांचा आरोप आहे.
नेमकं प्रकरण काय ?
2019 च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसचित जातीसाठी राखीव होता. या मतदारसंघाचं नेतृत्त्व तत्कालीन शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ करत होते. 2019 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी त्यांचा पराभव केला. मात्र नवनीत राणांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळांनी कोर्टाचं दार ठोठावलं होतं. अखेर कोर्टानं आज नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवत त्यांना 2 लाखांचा दंडही ठोठावला.