
– मंत्रिमंडळ बैठकीसाठी जिल्हाधिका-यांनी मागवला महापालिकेकडून प्रस्ताव
नांदेड, दि.10: नांदेड शहरातील दक्षिण भागात गोदावरी नदीच्या काठावर विपश्यना केंद्राच्या शेजारी भगवान तथागत गौतम बुद्ध यांच्या भव्य 32 फ़ूट उंचीची मूर्ती व परिसरात उद्यान विकसीत करण्यासाठी शासनाकडून 100 कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे केली आहे. खा. चिखलीकर यांच्या मागणीबाबत उभय नेत्यांनी सकारात्मक संकेत दर्शविल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या कामाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांना दिले आहेत.
नांदेड शहराला ऐतिहासिक आणि पौराणिक इतिहास आहे. संत परंपरेचे अनेक दाखले नांदेड शहरात मिळतात. भारतीय स्वातंत्र्य लढा, हैदराबाद मुक्तिसंग्राम तसेच आणिबाणीच्या काळातही नांदेड जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. नांदेड शहराच्या दक्षिण भागात गोदावरी नदीच्या काठावर पाच एकर जागेवर विपश्यना केंद्र सुरू आहे. या विपश्यना केंद्रात देशभरातून तसेच विदेशातून अनेक नागरिक ध्यानधारणेसाठी येत असतात. विपश्यना केंद्राच्या शेजारी सर्वे क्र. 31 मध्ये महानगरपालिकेच्या मालकीची अडीच एकर मोकळी जागा उपलब्ध आहे. त्या जागेत संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान तथागत गौतम बुद्ध यांची 32 मीटर उंचीची मूर्ती आणि परिसरात उद्यान विकसित केल्यास भाविकांसाठी तसेच पर्यटनासाठी एक सुंदर जागा उपलब्ध होईल, अशी कल्पना भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष साहेबराव गायकवाड यांनी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे मांडली. बुद्धमूर्तीची उभारणी व परिसर विकसित केल्यास गोदावरी नदीच्या नाभिस्थानी एक सुंदर पर्यटन स्थळ विकसित होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यावर या कामासाठी निधी उपलब्ध करण्यापासून इतर आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन खा. चिखलीकर यांनी साहेबराव गायकवाड यांना दिले. त्यानंतर खा. चिखलीकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे लेखी पत्र देऊन बुद्धमूर्ती व परिसर सुशोभिकरण कामासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.
साहेबराव गायकवाड यांचा पाठपुरावा
भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष साहेबराव गायकवाड यांनी या कामाबाबत खा. चिखलीकर यांच्याकडे पाठपुरावा केला. तसेच महानगरपालिकेने विविध यंत्रणेकडून कामासाठी ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करुन घेतली आहेत. नियोजित जागेत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती उभारण्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला असून या कामासाठी 15 कोटी रुपयांची प्राथमिक अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. परंतु, नांदेड महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे मनपा निधीतून हे काम करणे शक्य नसल्याने या कामासाठी शासनाकडून 100 कोटी रुपयांचा निधी मिळवून द्यावा, अशी मागणी साहेबराव गायकवाड यांनी खा. चिखलीकर यांच्याकडे केली. त्यावर जिल्हाधिका-यांनी महापालिकेकडून प्रस्ताव मागवला आहे.