
नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. अतिवृष्टीचा खरीप आणि बागायती पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी खा. प्रतापराव पाटील यांनी सातत्याने लाऊन धरली होती. या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडेही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. खा. चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश आले असून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 717 कोटी 88 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामाची सुरुवातच शेतकऱ्यांसाठी कष्टदायी होती. खरीपाची पिके जोमात आली असताना जुलै महिन्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले . 5 लाख 27 हजार 491 हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. 7 लाख 40 हजार 858 शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना मावेजा मिळवून देण्यासाठी शासन, प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावे. विनाविलंब प्रशासनाकडे पाठवावेत यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. शिवाय नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा त्यांनी अनेक वेळा दौरा केला .शेतकऱ्यांना मानसिक बळ देत असतानाच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते.
अतिवृष्टीने ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय ज्यांच्या घरात पाणी शिरून जीवनावश्यक वस्तूंची नासधूस झाली होती. अशा शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून अन्नधान्य आणि जीवन आवश्यक वस्तूंचा पुरवठाही खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून करण्यात आला होता . या परिस्थितीत शेतकऱ्यांनी नैराशत न जाता धीर धरावा, शिंदे – भाजप सरकार आणि केंद्र सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे .निश्चितपणे आपणास मदत मिळेल असा विश्वास खा. चिखलीकर यांनी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेटून दिला होता .या अनुषंगाने जिल्ह्यातील 5 लाख 27 हजार 491 हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल पंचनाम्यातून पुढे आला .ज्यात 7 लाख 40 हजार 828 शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला होता. शासनाने जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असून नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 717 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान या अनुषंगाने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना नांदेड जिल्ह्याचा आढावा घेतली होती. या बैठकीत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसान ग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार आहे .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जाहीर केलेला निधी लवकरच जिल्हास्तरावर उपलब्ध होईल त्यानंतर तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल . यासाठीची प्रक्रियाही गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.